पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयास किर्लोस्कर न्यूमॅटिक कंपनी लिमिटेड आणि ग्रीन वसुंधरा फाउंडेशन यांच्या ‘किर्लोस्कर वसुंधरा ग्रीन कॉलेज स्मार्ट कॉलेज स्पर्धा २०२५-२६' मध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यांच्या हस्ते हे पारितोषिक महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे, ग्रीन कॅम्पस समिती समन्वयक डॉ. शुभांगी शिंदे, प्रा. हेमलता सोनवणे प्रा. मेघमाला वाघमोडे, प्रा. उर्मिला धनगर यांनी स्वीकारले.
समारंभाचे प्रमुख पाहुणे अभिनेत्री भार्गवी चिरमुले, केपीसीएल ओएचसी प्रमुख डॉ. सुरेश मिजार, केपीसीएल सहयोगी उपाध्यक्ष एचआर गणेश चौधरी, केपीसीएल सीएसआर प्रमुख उमा नांदेडकर, ग्रीन वसुंधरा फाउंडेशन संचालक वीरेंद्र चित्रव, गणेश चौधरी आदी उपस्थित होते.
'ग्रीन कॉलेज स्मार्ट कॉलेज' हा केवळ एक पर्यावरणीय उपक्रम नाही तर तो वेगाने मानसिकता बदलणारी चळवळ बनत आहे. पर्यावरणपूरक स्मार्ट कॅम्पसचे महत्त्व विद्यार्थ्यांना कळवणे हा यामागील उद्देश असल्याचे डॉ. सुरेश मिजार यांनी सांगितले.
या स्पर्धेचे परीक्षण डॉ. सचिन पुणेकर, सुवर्णा भाम भूरकर यांनी महाविद्यालयास भेट देऊन महाविद्यालयातील ग्रीन कॅम्पसची पाहणी करून मूल्यांकन केले होते. महाविद्यालयातील" ग्रीन कॉलेज आणि स्मार्ट कॉलेज" सादरीकरण प्रा. मेघमाला वाघमोडे यांनी केले होते. महाविद्यालयातील बाग बगीचा, वृक्षारोपण, स्वच्छता, प्लास्टिक संकलन, सौर ऊर्जेच्या वापरातून वीज बचत, रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प, गांडूळ खत प्रकल्प, वनस्पती, जैवविविधता, पर्यावरण पूरक उपक्रम, प्लास्टिक फ्री परिसर, ग्रामविकासाचा वैज्ञानिक दृष्टिकोनातूनर् सर्वे,पर्यावरण संबंधीचे विद्यार्थ्यांनी केलेले संशोधन, ई कचऱ्याचा ड्राइव्ह इत्यादी उपक्रमांची दखल घेऊन हे पारितोषिक देण्यात आले.
या यशाबद्दल महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. सुनेत्रा पवार, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव ॲड. संदीप कदम, खजिनदार ॲड. मोहनराव देशमुख, उपसचिव एल. एम. पवार, सहसचिव (प्रशासन) ए. एम. जाधव यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे व त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले.

Comments
Post a Comment