अण्णासाहेब मगर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची प्लास्टिक प्रदूषणाविरुद्ध व्यापक जनजागृती
पुणे : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालय हडपसर येथील रसायनशास्त्र विभागाच्या वतीने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत “सामुदायिक सहभागीता प्रकल्प (Community Engagement Program) ” द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी यशस्वीपणे राबविला. या प्रकल्पाच्या माध्यमातून “प्लास्टिक कचऱ्यामुळे होणारे दुष्परिणाम आणि प्रदूषण” या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर समाजात जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण व्हावी आणि प्लास्टिकच्या वापरावर नियंत्रण आणण्याची गरज नागरिकांपर्यंत पोहोचावी, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
या प्रकल्पांतर्गत प्रभात फेरी, पोस्टर प्रदर्शन आणि पथनाट्य अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रभात फेरीचा मार्ग अण्णासाहेब मगर महाविद्यालय, हडपसर ते मुलींचे वसतिगृह, अण्णासाहेब मगर महाविद्यालय असा ठेवण्यात आला होता. या रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी हातात फलक, घोषवाक्ये आणि जनजागृतीपर संदेश घेऊन परिसरातील नागरिकांना प्लास्टिकच्या दुष्परिणामांविषयी जागरूक केले. “प्लास्टिक मुक्त भारत”, “पर्यावरण वाचवा”, “प्लास्टिकला नकार द्या” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
पोस्टर प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी प्लास्टिक प्रदूषणाचे पर्यावरणावर होणारे परिणाम, सागरी जीवसृष्टीवरील संकट, माती व पाण्याचे होणारे प्रदूषण तसेच मानवाच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम यांचे प्रभावी सादरीकरण केले. पथनाट्याद्वारेही नागरिकांना प्लास्टिकचा वापर कमी करण्याचा आणि पर्यायी पर्यावरणपूरक साधनांचा अवलंब करण्याचा संदेश देण्यात आला.
या रॅलीसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे (व्यवस्थापन परिषद सदस्य, पुणे विद्यापीठ) यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले की प्लास्टिक प्रदूषण ही गंभीर समस्या असून प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे सांगितले. रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. लतेश निकम यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला. तसेच डॉ. गाडवे सर व धोत्रे मॅडम यांचेही मार्गदर्शन लाभले.
या कार्यक्रमास डॉ. सुनिता दानाई मॅडम, डॉ. शितल मॅडम, प्रा. महेश शिंदे, प्रा. शिल्पा गायकवाड, प्रा. ताजुको महाले, प्रा. अपूर्वा बनकर, प्रा. प्रियंका भिसे , प्रा. देवयानी जगताप, प्रा. तृप्ती जाधव आणि चंद्रकांत साठे उपस्थित होते. सर्व शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागामुळे हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला. या जनजागृती मोहिमेमुळे नागरिकांमध्ये प्लास्टिक प्रदूषणाबाबत जागरूकता निर्माण होऊन पर्यावरण संरक्षणासाठी सकारात्मक पाऊल उचलले जाईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. या उपक्रमास पुर्णम इकोव्हिजन संस्थेच्या सायली महाले मॅडम उपस्थित होत्या त्यांनी प्लास्टिक प्रदूषण सारख्या गंभीर विषयावर जनजागृती केल्याबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक केले.



Comments
Post a Comment